निशाचर!


राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. बरोबर आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकल वर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा टॉर्च घेऊन खिडकीतून बाहेर झाडांवर काही दिसते आहे का ते बारीक नजरेने बघत होता. चालत्या गाडीतून याला असे काय दिसणार असे म्हणून मी मनात हसलो आणि गाडीचा वेग खूपच कमी केला. पण बेट्याची नजर भलतीच तयार होती हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात राकेशने गाडी थांबवायला सांगितली आणि आम्ही खाली उतरलो. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या फांदीला एक छोटासा हिरवा साप लटकत असलेला दिसला. चालती गाडी, टॉर्चचा प्रकाश, तोही हालणारा, आणि आजूबाजूला काळामिट्ट काळोख यात त्याला हा साप दिसला याचे आश्चर्य व्यक्त करून मी त्या सापाकडे निरखून बघितले. हिरव्या रंगाचा तो साप आपले मण्यासारखे डोळे चमकवत आमच्याकडे कुतूहलाने बघत होता. त्याची छोटीशी जीभ मधूनच बाहेर येत होती. राकेशने त्याला अलगद केव्हा हातावर घेतले हे बहुदा त्यालाही कळले नसावे. मग मात्र त्याचे सौंदर्य नजरेत भरले. त्याच्या खवल्यांचा रेशमी, तलम पैठणीसारखा रंग त्या तुटपुंज्या प्रकाशातही चमकत होता. सापाला हाताळायचीही एक पद्धत असते. तो आपला आपल्या हातावरून पुढे पुढे जात असतो. आपला हात संपला की तो हवेत उंच होतो आणि काही आधार मिळतो का हे बघतो. त्याच वेळी आपण आपला दुसरा हात त्याला द्यायचा म्हणजे तो परत त्या हातावर सरपटू लागतो. मला आपल्या ट्रेडमीलची आठवण झाली. अर्थात हे बर्‍याच वेळा झाले की त्याला राग येऊन तो त्याच्या खवल्याचे रंग बदलू लागतो. त्याला सोडायची वेळ झाली असे समजून त्याला मग आम्ही परत झाडावर सोडले. त्याचा थंडगार पण मऊ स्पर्श आमच्या सगळ्यांच्या अजूनही लक्षात आहे. तेवढ्यात बाबा व त्याचा मित्र येऊन पोहोचले. त्यांनी त्या सापाचे काही फोटो काढले.
बाबा म्हणाला “ काका मी मागे जरा अंतर ठेवून गाडी चालवतो. मला काही दिसले तर मी गाडीचे डिपर मारेन. तुम्ही लगेच थांबा. जर तुम्हाला काही दिसले तर तुम्ही गाडीचे ब्लिंकर द्या मग मी पण गाडी हळू चालवेन आणि जरा अगोदरच गाडी बंद करेन.”
यात काय एवढे, असे समजून मी म्हणालो “ ठीक आहे. तसंच करूया!”
पण त्या जंगलात गाडीच्या प्रकाशात खोलवर दृष्टी खुपसून बघत असताना मागे कुठले लक्ष जायला ? शेवटी व्हायचे ते झालेच. बाबाचा फोन आला ”काका मी केव्हापासून डिपर मारतोय कुठे आहे तुमचे लक्ष ? आता गाडी थांबवून सगळे जण चालत मागे या. एक गंमत दाखवतो तुम्हाला.”
आम्ही लगेचच गाडी बंद करून, कॅमेरे तयार करून मागे निघालो. जे आम्ही बघितले ते केवळ अवर्णनीय आणि अविश्वसनीय!
माझे सुरवातीचे काही क्षण चुकले पण बहुतेक संपूर्ण प्रसंग मी कॅमेर्‍यात पकडण्यात यशस्वी झालो. वेळ: रात्रीचा एक. त्यामुळे फोटोचा दर्जा एवढा चांगला नाही पण मला खात्री आहे तुम्हाला ते निश्चितच आवडतील कारण हे बघायला मिळणे तसे दुर्मिळ आहे...
बाबाने दाखवलेल्या झाडापाशी आलो तर खालील दृश्य दिसले आणि क्षणात शांतता पसरली. एका छोट्या सापाने...बहुदा तो कॅट स्नेक होता, त्याने एका झाडावर डुलकी काढत असलेल्या बुलबुलला मटकवण्याचा प्रयत्न चालवलेला होता. बाबाच्या म्हणण्यानुसार, तो बुलबुल झोपलेला असणार आणि त्या सापाने त्याच्या तोंडाकडून त्याच्यावर झडप घातली असणार. ते तर दिसतच होते. बुलबुल तसा आक्रमक पक्षी. तो बेसावध नसता तर त्याने निश्चितच त्या सापाशी मारामारी केली असती. पण आता तो काहीच करू शकत नव्हता. दृश्य मोठे केविलवाणे होते, पण जंगलात निसर्गाचेच नियम चालतात. क्षणभर आमच्यातील एकाला वाटले की त्या बुलबुलला त्या सापाच्या तावडीतून सोडवावे पण मी त्याला त्यापासून परावृत्त केले. निसर्गाचे नियम, कायदेकानून बदलायच्या भानगडीत आपण का पडू नये हे त्याला मी थोडक्यात समजावून सांगितले आणि नशिबाने त्याला ते पटले. मग आम्ही त्या प्रसंगाच्या भोवती छानसा मुक्काम टाकला तो जवळ जवळ दोन तास.

झाडावरून खाली लोंबकळत असलेला बुलबुल. सापाचा जबडा बघा केवढासा आहे. तो नंतर किती मोठा होणार आहे हे लवकरच दिसेल.
चोच सापाच्या तोंडात आणि ज्या पायाने फांदी घट्ट पकडायची ते लटकणारे हताश पाय.

चोच अडकल्यामुळे चिडलेला साप. साप चिडला की त्याच्या खवल्याचा रंग बदलतो. या वेळी आम्हाला वाटले की आता हा साप या पक्षाला गिळणे शक्य नाही. तो आता त्याला परत बाहेर टाकणार. पण गंमत म्हणजे त्याने तो थोडासा बाहेर काढला आणि ती चोच सरळ करून परत गिळायला चालू केले.
आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेतल्यावर बुबुळे बाहेर येणारच. पुढून काढलेला फोटो.




 यावेळी तो पक्षी लटकत असल्यामुळे गिळायला अवघड होत होते. सापाने त्यावर जी युक्ती वापरली ती भन्नाट होती. गुरुत्वाकर्षणामुळे त्याला तो गिळताना त्रास होत असणार. त्याने सरळ त्याला आधार देऊन आडवा केला आणि आपले काम चालू केले. आम्ही अवाक्‌ होऊन बघतच राहिलो.
बघा त्याचा जबडा किती वासलेला आहे. विश्वास बसायला कठीण पण मी बघितले म्हणून विश्वास बसला.
समाप्त होत आलेले भोजन. हे सर्व होत असताना साप त्यात इतका गुंगून गेला होता की त्याला भवताली काय चालले आहे याची शुद्धच नव्हती. आम्ही मात्र भराभर फोटो काढत होतो. थोडासा आवाज होत होता पण त्याला त्याची फिकीरच नव्हती.
बुलबुल पोटात गेल्यावर शांतपणे त्या सापाने परत झाडावर सरपटायला चालू केले. जणू काही काही घडलेच नव्हते.

 


अजून दिसलेला एक साप. हे सगळे साप झाडांवर लटकत होते. आणि बाबा व राकेश आनंदाने, त्यांना त्रास होणार नाही असे हाताळत होते.






आज आमचे नशीबच जोरावर होते. थोडे पुढे गेलो तर एक विस्मयकारक दृश्य दिसले. माझी समजूत अशी होती की गोगलगाय ही पूर्णत: शाकाहारी असते. पण येथे तर ही बया एका मेलेल्या पतंगाचे मास खाताना सापडली.





एका झुडपावर एक मॉथ(पतंग) दिसला. त्याचे डोळे कसे चमकताहेत ते पहा. अर्थात हा तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल.



त्या रात्री आम्हाला निसर्गाचे अजूनही चमत्कार बघायला मिळाले. सगळ्यांबद्दल लिहिले तर अनेक पाने खर्ची पडतील. रात्रीचा निसर्ग किती वेगळा आणि भितीदायक असू शकतो हेही आम्ही अनुभवले. ती दुनियाच वेगळी. एक झाड तर चिनी दिव्यांच्या माळा लावल्यासारखे चमकताना मी पाहिले. असंख्य काजव्यांचे ते जग त्या गडद रात्री प्रकाश टाकत होते. कोणासाठी कोणास ठाऊक ! रात्रीचे दीड वाजत आले होते. उद्या परत पहाटे दुसर्‍या जंगलात जायचे असल्यामुळे परत फिरायचे ठरवले ते परत यायचे ते ठरवूनच !

 
 पहाटे उठलो तोच मुळी पक्षांच्या किलबिलाटाने. तो ऐकताना रात्रीच्या बुलबुलची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही हे खरे. तेवढ्यात एका सुंदर फुलाचे दर्शन झाले आणि रात गयी बात गयी या न्यायाने परत जंगलात निघालो.


रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते आणि मी एकदम गाडी थांबवली. सायलीच्या हातात कॅमेरा. समोर एक शिल्प. गव्याचे. मी सायलीला म्हटले “अग ते तळजाईवर नाही का हत्तीचे फायबरचे शिल्प आहे तसे येथे करून ठेवलेले दिसते. हे बघून काय करायचे ? खरा गवा दिसायला पाहिजे. जाऊ देत !. पण चांगले केले आहे.”
अगदी हुबेहूबच केले होते त्या शिल्पकाराने. जणू जिवंत गवाच उभा आहे. त्याचे ते स्नायू बघून मी चक्रावून गेलो. पायात जणू पांढरे मोजे घातलेले ! असा तो पुतळा बघून आम्ही निघणार तेवढ्यात सायली किंचाळली” बाबा तो शेपूट हालवतोय !”
बापरे ! आमची तर भितीने गाळणच उडाली. तो शांतपणे दहा फुटावरून आमच्याकडे बघत उभा होता. सायलीच्या हातात कॅमेरा असून फोटो काढायचे ना तिला भान होते ना मला तिला सांगायचे. आम्ही नुसते एकमेकांकडे बघत होतो. तो बाहेर आम्ही गाडीत. शेवटी मी म्हणालो “ सायली फोटो !” तिने शटरचे बटण दाबले आणि हा फोटो आम्हाला मिळाला.
याचे अंदाजे वजन १५०० किलो असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.हे बघितल्यावर खरे सांगायचे तर अजून काही बघायची इच्छा राहिली नव्हती. ढगही दाटून आले होते आणि आम्ही यशस्वी माघार घ्यायची ठरवली आणि घेतली.
















लेखक: जयंत कुलकर्णी 

८ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

जयंतकाका, जबरी फोटो आणि वर्णन... निसर्ग खुप विशाल आहे, त्याच्यासमोर कस्पटासमानच :) :)

Unique Poet ! म्हणाले...

एक शंका आहे.... तो पक्षी बुलबुलच होता का...? आकारमानामुळे शंका आली...

Unique Poet ! म्हणाले...

बाकी......... लेख झकास आणि मस्त अनुभव ! :)

सिद्धार्थ म्हणाले...

फोटो, वर्णन आणि तुम्ही घेतलेला अनुभव... एकदम जबरदस्त

Meenal Gadre. म्हणाले...

वाचनातून सर्व प्रसंग प्रत्यक्ष अनुभवले. फोटोने तर लेखनाला अधिकच जान आणली.

davbindu म्हणाले...

जयंतकाका,तुमच्या शब्दातून आम्ही ती निशाचर प्राण्यांच्या विश्वातील सफर घडवून आणणारी रात्र अनुभवली.
छायाचित्र तर एकदम जबराट ...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

प्रत्ययकारी चित्रण! सापाला राग आला की खवल्यांचा रंग बदलतो हे नवीनच. गव्याच्या शिल्पातले नाट्य मस्तच. मस्त सैर घडवलीत.

विनायक पंडित म्हणाले...

जयंतजी अफलातून छायाचित्रं आणि वर्णन! सुपरलाईक!