अंतर्नाद!

मासिकांचे खरे काम म्हणजे चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे. पण माझ्या  माहितीमध्ये अशी काही लोकं आहेत की जी या मासिकांच्याकडे पूर्णपणे एक पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. कोणालाच माहीत नसलेले वार्षिकांक , दिवाळी अंक काढणे म्हणजे पैशाची बेगमी. काही प्रथितयश लेखकांना हाताशी धरून त्यांच्याकडून हलवाई जसा बुंदी पाडून घेतो त्याप्रमाणे लेख, कविता पाडून घ्यायच्या  , आणि जाहिरातदारांकडून जाहिराती मिळवायच्या- की झालीच वर्षभराची कमाई. वार्षिकांक  काढणं हा एक धंदा झालेला आहे हल्ली.

तसंही मासिकांचे सोनियाचे दिवस गेले आजकाल . एकेकाळी किर्लोस्कर, मनोहर, स्त्री वगैरे चांगल्या मासिकांची चलती होती. बहुतेक सगळे सुशिक्षित लोक ही मासिकं वाचायची,  पण आता त्यापैकी किती ’मासिकं’ ही  मासिक स्वरूपात प्रसिद्ध होतात हे पण मला माहिती नाही. या शिवाय माझी आवडती मासिकं म्हणजे  अमृत, विचित्र विश्व, नवल, आणि मुलांचे मासिक! ह्या रिडर्स डायजेस्टला डोळ्यासमोर ठेवून काढलेल्या मासिकांची खूप चलती होती.वाचनालयात नंबर लावून मिळायचं विचित्र विश्व वाचायला.

एक गोष्ट निश्चितच खरी आहे की पूर्वी जसे आमचे वडील वगैरे ’प्रसाद’ ( य. गो. जोशींचे)  किंवा अमृत,   दर महिन्याला घरी येईलच म्हणजे  सगळ्यांना वाचायला मिळेल म्हणून वार्षिक वर्गणी भरायचे, तशी हल्ली फार कमी लोकं वर्गणी भरून मासिकं वाचतात- ( कारण काहीही असो, चांगली मासिकं हल्ली निघत नाही वगैरे वगैरे, आणि जर कुठली चांगली असतील तर आम्हाला ठाऊक नाही म्हणून )  ह्याच कारणामुळे मराठी  मासिकाला चांगले दिवस आहेत असे वाटत नाही. 

नुकताच एकदा आयडीयलला गेलो होतो , तिथे समोर मांडून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक दिसले, आणि त्याच्या लेखकाचे नांव पाहून अजिबात विचार न करता ते पुस्तक उचलून घेतले. भानू काळे!!  अंतर्नाद या मासिकाचे संपादक! साहित्यिक वर्गात अंतर्नाद हे मासिक माहीत नाही असा माणूस विरळाच! गेली पंधरा वर्ष एकांगी लढा देत दर महिन्याला न चुकता आपलं मासिक काढत असतात.आजच्या बाजारात असलेल्या असंख्य मासिकांच्या मधले एक उत्कृष्ट मासिक म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.

अंतर्नाद हे मासिक  चांगलं साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  सुरु करण्यात आले होते. डावे- उजवे, दलित- सवर्ण, ग्रामीण -शहरी,  स्वतःला व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त - अनुपयोगी , प्रस्थापित- नवोदित असे कुठलेही साहित्यबाह्य निकष न लावता केवळ चांगले साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंतर्नादने सातत्याने केलेला आहे.

अंतर्नाद मध्ये बर्‍याच लेख-मालिका प्रसिद्ध झाल्या, त्यांची नंतर पुस्तकं पण छापण्यात आली. शान्ता शेळके यांचे कविता स्मरणातल्या , लक्ष्मण लोंढे यांचे लक्ष्मण झुला.  या मासिकाची एक आठवण सांगतांना श्री भानू काळे लिहितात, कित्येक वर्ष सातत्याने आपले नांव न लिहीण्य़ाच्या अटीवर एक पूर्णं पृष्ठ जाहीरात अरुण किर्लोस्करांकडून दिली जात होती. जाहीरात देताना त्यामध्ये कंपनीचा लोगो पण वापरू नये ही अट घातली होती. चांगल्या कामासाठी चांगले लोकं नेहमीच पुढे येतात. या व्यतिरिक्त  पण नियमीतपणे जाहीरात देणारे बरेच लोक आहेत.

मराठी मासिक, ज्यामध्ये लेख छापून आल्यावर कुठल्याही प्रथितयश लेखकाला जे समाधान वाटतं, ते केवळ अंतर्नादच्या  याच गुणांमुळे. कित्येक वर्ष शान्ता शेळके यांच्या कवितांवर लेख छापून येत होते . त्याचंच एकत्रित  निघालेले पुस्तक वर दिलेले कविता स्मरणातल्या. अंतर्नादचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे असलेले व्याकरण सल्लागार यास्मिन शेख. त्यामुळेच या मासिकामध्ये व्याकरणाच्या चुका नाहीत असे भानू काळे आवर्जून लिहितात. 

लेखकांची पळवापळवी हा तर नेहमीचा प्रॉब्लेम आहे. पण तरीही प्रत्येक लेखाखाली त्या लेखकाचे नांव आणि फोन नंबर  दिले जातात.  या अंकाची दहा वर्ष पूर्णं झाल्यानंतर लिहिलेल्या लेखामध्ये भानू काळे यांनी लिहिले आहे की इतकं सगळं असूनही आज अंतर्नादचे वर्गणीदार फक्त   १५६० च्या आसपास आहेत. एका वाचकाने म्हटले होते की जर प्रत्येक वाचकाने फक्त एक अजून नवीन वर्गणीदार मिळवून दिला तर हे मासिक चालवणे थोडे सोपे जाईल. दर महिन्याला जवळपास  १५६० अधिक ८० प्रतीभेट म्हणून पाठवल्या जाणार्‍या प्रती छापल्या जातात. इतक्या कमी प्रती छापल्यानंतर त्याचा ब्रेक इव्हन येणे फार कठीण आहे हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही.

त्यांच्या एका लेखातील एक वाक्य " मासिक छापणे हे एक श्रेयविहीन ( थॅंकलेस ) काम आहे" मनाला खूप लागलं. इथे या लहानशा लेखातून या चांगल्या मासिकाचे वर्गणीदार व्हा म्हणून सगळ्या मराठी लोकांना  आवाहन करतो. अंतर्नादची वार्षिक वर्गणी फक्त ४५० रुपये आहे आणि पत्ता खाली दिलेला आहे.

अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट जवळ
वायरलेस कॉलनी जवळ
औंध, पुणे.. ४११००७

लेखक: महेंद्र कुलकर्णी

७ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

महेंद्रकाका, तुम्ही मागे बोलला होतात ह्या मासिकाबद्दल. मी वर्गणीदार होतोय.. माहितीसाठी खुप खुप आभार !!

श्रेया म्हणाले...

मुंबईत कुठे संपर्क करता येईल का ?

Mahendra Kulkarni म्हणाले...

मुंबईला कुठेच मिळणार नाही. पण पुण्याला वार्षिक वर्गणी भरल्यास वर्षभर अंक घरी येतो. माझ्या घरी गेली कित्येक वर्ष हा अंक घेतो आहे मी.

Yogesh म्हणाले...

काका, माहितीसाठी धन्यवाद.

davbindu म्हणाले...

माहितीसाठी धन्यवाद,वर्गणीदार होण्यासाठी पुण्याला जाण गरजेच आहे का ?त्यांचा काही संपर्क क्रमांक ?

क्रांति म्हणाले...

मीही अंतर्नादचे काही अंक वाचले आहेत माझ्या बहिणीकडे. मलाही वर्गणीदार व्हायचं आहे. पत्त्याबद्दल धन्यवाद.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

पत्त्याबद्दल धन्यवाद.