हसतोस काय? ये ना, धरती मिठीत घे ना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
नुसत्याच चाहुली का? आभाळ फक्त काळे
हृदयात दाटलेले विरतील पावसाळे
अधिर्या तनामनाची ही आग सोसवेना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
हळुवारशा सरींनी शिंपीत ये धरेला
कल्लोळ घेउनी वा पेटून ये इरेला
उजळून देत ये की उधळून देत ये ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
गर्भातल्या बिजांना फुटतील कोंब ताजे
हिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
हो, तेच थेंब अन् त्या वेड्याखुळ्या सरीही
नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळेना?
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
कवयित्री: क्रांति साडेकर
१२ टिप्पण्या:
सुंदर !!!! क्या बात है !
गर्भातल्या बिजांना फुटतील कोंब ताजे
हिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!
सुंदर.. खुप आवडली !!
असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल. अतीशय सुंदर,सहज आणि आशयघन.
"नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळेना?"
या ओळी सर्वात जास्त भावल्या.
असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल...+१
सहज, सुंदर कविता आवडली ...
मस्तच !
सहज बोलवावं तसं सुंदर आवाहन आहे हे ! :)
‘तू भेटसी नव्याने’ हे किती सार्थ आहे. कविता वाचून शृंगाराची ओढ हा विषय कधीही नवानूतनच राहातो आणि राहील असे वाटत राहिले. त्याच विषयावरची एक प्रसन्न ताजी, टवटवीत कलाकृती. वा!
वा! छानच आहे कविता. कोणीतरी याला छानशी चाल लावली तर सुंदर गाणे बनेल.
असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल.
खरेच ..
खूप सुरेख ... :)
छानच! कुणी चाल लावली तर मस्त गीत जमून येईल!
मंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून त्याचा दुवा इथे देत नाही. गोड मानून घ्या - http://www.divshare.com/download/15127470-7fc
मंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून गोड मानून घ्या.
आधीचा दिलेला दुवा काम करत नाहिये. हा घ्या नवीन दुवा. http://www.youtube.com/watch?v=T6Q8CByUUa4
सगळ्यांना धन्यवाद!
श्रेयाताई, मस्तच जमलीय चाल. मला खूप आवडली. मी पण पाठ करीन.
टिप्पणी पोस्ट करा