संपादकीय

'ऋतू हिरवा २०११' ह्या वर्षा विशेषांकाकरीता साहित्य पाठविण्याचे आवाहन मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात करण्यात आले होते. ती वेळ म्हणजे मे महिन्याचा कोरडा,रखरखीत  उन्हाळाच होता. ह्या वातावरणाचा परिणाम म्हणून की काय सुरूवातीला फक्त २-३ जणांकडूनच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जालरंग प्रकाशनाचा हा अंक उन्हाळ्याप्रमाणेच कोरडा राहतो की काय अशी शंका सतावू लागली होती. 'लोक आता ह्या अंकांना कंटाळले असतील आणि आपण आता हा उपक्रम बंद करूया का?' असे प्रश्नही पडले.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला जोरदार सुरूवात झाली. लेखन पाठविण्याचा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला. सोबतच बाहेर पावसाचा जोरही वाढत होता. आणि एकदम ह्या अंकासाठीही जोरदार प्रतिसाद देऊन साहित्यिकांनी साहित्याचा अक्षरशः पाऊसच पडला. हो, ह्या अंकाकरीता आलेली साहित्यसंख्या आहे..तब्बल बत्तीस.  सुरूवातीला थेंब थेंब पाऊस, नंतर पुन्हा कोरडे आणि शेवटच्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडतो..अगदी तसेच झाले.

पण वर्षा विशेषांक म्हणजे ह्यात फक्त 'पाऊस' ह्या एकाच विषयावरचं साहित्य नाहीये तर इतरही विविधरंगी साहित्यप्रकार तुम्हाला ह्यात वाचायला व ऐकायला मिळतील. हो, ऐकायलाही.. कारण ह्यात आहे  अभिवाचन, काव्यवाचन. लेखन प्रकारात पावसावरील कविता,  गझल, तसेच अनुभव, क्रीडा, दूरदर्शन मालिका परिचय, पुस्तक परिचय, चित्रपट परिचय, सत्यकथा, तंत्रज्ञान विषयक माहिती, वन्यजीवन, व्यक्तिचरित्र इत्यादि विषयांवरचे लेखनही तुम्हाला चाखायला मिळेल.
असे बहुरंगी साहित्य-प्रकार अंकाकरीता दिल्याबद्दल सर्व साहित्यिकांचे आभार आणि अभिनंदन. फक्त साहित्यच नव्हे तर ते साहित्य आपणा सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरीता अंकाचे संपादन आणि सजावट महत्त्वाची असते. त्यासाठी मेहनत घेऊन असा चांगला अंक बनवणार्‍या संबंधितांनाही धन्यवाद आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन.
आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. जालरंग प्रकाशनातर्फे आम्ही तुमच्यासमोर सादर  करत आहोत
ऋतू हिरवा २०११
.

तुम्हीही चहा, भजी तयार ठेवा आणि हिरव्या पानांच्या व मधून मधून पडणार्‍या पावसाच्या सोबतीने ह्या वर्षा विशेषांकाचा आस्वाद घ्या. आणि हो, अंक कसा वाटला ते ही नक्की लिहा.

कळावे,लोभ असावा,
आपलाच
देवदत्त गाणार
संपादक


प्रवेश!

१२ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

देगा, मस्तचं झालंय संपादकीय !!

आता अंक वाचतो. सगळ्यांचे आभार !!

लिना म्हणाले...

अभिनंदन...

Gangadhar Mute म्हणाले...

अभिनंदन.
मुखपृष्ट सुंदर झाले आहे. अंकही सुंदर असणारच.
यथावकाश वाचतो आणि आणि प्रतिसादही नोंदवतो.
वेळेअभावी सहभाग नोंदवता आला नाही, याचे शल्य आहेच. :)

क्रांति म्हणाले...

अतिशय आकर्षक आणि मनमोहक मुखपृष्ठ आणि अगत्याचं संपादकीय! जिंकलं अंकानं इथंच. बाकी प्रतिक्रिया देतेच अंक वाचून, इथून मात्र प्रतिसाद दिल्याखेरीज पुढे जावं वाटलंच नाही!

हेरंब म्हणाले...

मुखपृष्ठ आणि संपादकीय झक्कास.. आता बाकीचा अंक वाचतो. तोही असाच अप्रतिम असणार यात शंकाच नाही.

अपर्णा म्हणाले...

मस्तचं झालंय संपादकीय ...short n sweet..:)

alka katdare म्हणाले...

मुखपृष्ठ आणि संपादकीय खूपच छान, आवडले.
कविताही सुंदर आहेत.
संपादक मंडळाची मन:पूर्वक आभारी.

आनंद पत्रे म्हणाले...

अभिनंदन... अंक आणि संपादकीय मस्त झाले आहे...

Yogesh म्हणाले...

अभिनंदन...अंक खुप मस्त झाला आहे.

अनामित म्हणाले...

अभिनंदन ...अंक छान झाला आहे,संपादकीयही शोर्ट एन स्वीट झालय.बाकी मध्ये कमेंटतोच...

Vinayak Pandit म्हणाले...

पावसाबरोबर येणार्‍या नको त्या तापाने बेजार झालोय! शेवटी आज संगणकाचा पडदा उघडलाच.अंक बघितला आणि पहिल्याच क्षणी प्रेमात पडलोय! सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद! श्रेयाजी तुम्ही अफलातून कामगिरी केली आहे! आभार! विस्तृत प्रतिक्रिया देईनच! :)

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

अभिनंदन... अंक आणि संपादकीय मस्त झाले आहे...