शांतता छळते मला तू वादळे उठवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
तप्त सूर्या कैद केले आज मेघांनी असे !
आस रुजली पावसाची स्वप्न नयनी छानसे
नाच मयुरा तू पिसारा अंगणी फुलवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
वावरे मरगळ अशी का? तापल्या धरतीवरी
या नभांनो या जराशा घेवुनी हलक्या सरी
गंध मातीचा जगी या तू मृगा पसरून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
वाट बघती सर्व ज्याची तोच तो मधुमास तू
वृद्ध अन प्रेमी जनांचा, बालकांचा खास तू
हिरवळीने तू धरेला श्रावणा सजवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
वेदना गडगंज होत्या हास्य मजला पारखे
सूर विरहाचेच होते छेडले मी सारखे
मेघमल्हारात जगणे शारदे शिकवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
रागिनी सजल्या सवरल्या षड्ज धैवत लागता
शब्द भिजले, जाणिवांना शुद्ध कांही लाभता
गात तू "निशिकांत" गाणे जीवनी हरवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
कवी: निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३
९८९०७ ९९०२३
३ टिप्पण्या:
तप्त सूर्याचे कैद होणे आणि वेदनांचे गडगंज असणे आवडले. पण अशा भव्य कल्पनापुढे इतर ओळी त्या मानाने थिट्या वाटतात. म्हणून फारसे प्रतिसाद आले नसावेत.
खास म्हणजे पहिल्या दोन ओळी वाचता वाचता मी पुढील ओळी ’पूर्तता माझ्या व्यथेची’ च्या चालीवर वाचत गेलो. त्यामुळे जास्त मजा आली.
रागिनी सजल्या सवरल्या षड्ज धैवत लागता
शब्द भिजले, जाणिवांना शुद्ध कांही लाभता
गात तू "निशिकांत" गाणे जीवनी हरवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा
भिजवलेत :)
"रागिनी सजल्या सवरल्या षड्ज धैवत लागता
शब्द भिजले, जाणिवांना शुद्ध कांही लाभता
गात तू "निशिकांत" गाणे जीवनी हरवून जा"
.... हे अधिक आवडलं
टिप्पणी पोस्ट करा