माहेर!

कशी माहेराची ओढ,
जाते काळजाला चीर.....
येता आठव तयाचा
लागे मनी हुरहूर..

आई माझ्या संगतीने
एक रोप, तू लाविले,
अन माझ्याच साथीने
रूप त्याचे गं फुलले,

आज एकटेच काय,
सांग करीत असेल?
मजविण सांग त्याला
बहरणे की जमेल ?

सांग हात त्याचे असे
आज झालेत का सुने?
माझ्यावाचून का त्याला,
फिके भासते चांदणे..

रुमझुमत पैंजणी,
पाय नाचती अंगणी,
पुन्हा पुन्हा आठव हे,
सांग येती का गं कानी?

मला पाहताच बाबा,
म्हणे पोर ही अजाण,
ज्याच्या हाती जाशील तू,
तेथे सुवर्णाची खाण....सांग ना गं आई....

माझी आठवण तिथे
येते कोणा कोणा
माझ्या श्वासाचा गं भास...
तिथे होतो कोणा कोणा...कवयित्री: हर्षा पुष्कराज स्वामी
     
         

६ टिप्पण्या:

Unique Poet ! म्हणाले...

छान !
या छंदातील कविता बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाली... :)

davbindu म्हणाले...

माहेरची ओढ आणि त्यासंदर्भातील भावविश्व छान सादर केलत.

क्रांति म्हणाले...

वा. छानच आहे कविता. कितीही मोठं झालं, तरी माहेरची ओढ वेड लावतेच!

दीपक परुळेकर म्हणाले...

माहेराची ओढ सुंदर छंदात मांडली आहे.
अभिनंदन !

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

काळजाची चीर, फिके चांदणे, सुवर्णाची खाण, वा! क्या बात है! श्वासाचा भास मध्ये ती हुरहूर, ती वेदना काय मस्त पकडली आहे!

alka katdare म्हणाले...

khup chhan layadar zaliy. sundar.