प्रतीक्षा

 
तू असताना सवे काळ हा, वायूवेगे जाई पुढे
तू नसताना का मग त्याला, कूर्मगतीचा रोग जडे        

येशिल कधि तू कधी भेटशिल, आतुरता ही मनि दाटे
रोज रोजचे जरी भेटणे, रोजच हुरहुर का वाटे

चातक जणु मी वाट पाहतो, क्षण युग भासे धीर नुरे
दिसता अभिसारिका गमे मज, दोन अंगुळे स्वर्ग उरे

विलंब करिशी रोज यायला, जाण्याची का इतकी लगबग
आल्यावर जाण्याची लगबग, का न कळे तुज माझी तगमग

विरह भेटिची पाठशिवण ही, सांग सखे संपेल कधी
सात जन्मिची साथ लाभण्या, सात पदे चलणार कधी

कवी: उल्हास भिडॆ