जीवन ताजे ताजे

होते माझे, आहेत माझे, असतीलही माझे
अशाच लोकासंगे जगलो, जीवन ताजे, ताजे

वानवा कधी मला न पडली, स्नेहाची, प्रेमाची
गरज कधी ना मला भासली, अर्थाची, हेमाची
आप्तांच्या या जगात म्हणती, मजला राजे, राजे
अशाच लोकासंगे जगलो, जीवन ताजे, ताजे

तुडुंब भरला डोह अंगणी, आनंदी आनंद असे
आठवणींचे तरंग उठती, भूतकाळही मंद हसे
भविष्यातही सर्व चांगले, असेल माझे, माझे
अशाच लोकासंगे जगलो, जीवन ताजे, ताजे

नात्यांच्या या मळ्यात मिळतो, खूप खूप गारवा
सारे माझे मी सार्‍यांचा, विशाल हा कारवाँ
तृप्त जीवना आपुलकीची, किनार साजे, साजे
अशाच लोकासंगे जगलो,जीवन ताजे, ताजे

माझ्या वरती सदा सावली, देवाच्या मायेची
सावलीत त्या नसे काळजी, नश्वर या देहाची
बघून माझे भाग्य चमकते, कुबेर लाजे, लाजे
अशाच लोकासंगे जगलो,जीवन ताजे, ताजे

काय बिघडले हत्ती जर का, झुलले नाही दारी?
देव उगा का रुसेल जर मी, केली नाही वारी?
सत्कर्माची फक्त तुतारी, स्वर्गी वाजे, वाजे
अशाच लोकासंगे जगलो, जीवन ताजे, ताजे


कवी: निशिकांत देशपांडे
मो.नं. ९८९०७ ९९०२३

५ टिप्पण्या:

सुहास झेले म्हणाले...

माझ्या वरती सदा सावली, देवाच्या मायेची
सावलीत त्या नसे काळजी, नश्वर या देहाची
बघून माझे भाग्य चमकते, कुबेर लाजे, लाजे
अशाच लोकासंगे जगलो,जीवन ताजे, ताजे

वाह अप्रतिम !! खुप छान जमलीय :)

davbindu म्हणाले...

सगळीच कडवी सुंदर जमली आहेत ...सुंदर कविता, आवडली ...

क्रांति म्हणाले...

आवडली कविता.

alka katdare म्हणाले...

अशाच लोकासंगे जगलो, जीवन ताजे, ताजे
- mast oli ani kalpanahi. samadhani ayushyache pratik. va!

ulhasbhide म्हणाले...

"तुडुंब भरला डोह अंगणी, आनंदी आनंद असे
आठवणींचे तरंग उठती, भूतकाळही मंद हसे"

.... छान