श्रावणरात !

चिंब नाहलेली एक, ओली श्रावणरात
वेड लावीत मनाला, रिमझिम बरसात
एक वणवा पेटला, उभ्या तनात मनात  
गोड स्वप्नाच्या आशेत, माझी निरांजनी वात ..!!

दूर मनाच्या रानात, दाटे हळदीचे ऊन
तेव्हा  अनोखी लकेर, उठे कोण्या पाव्यातून
माझे सर्वांग आतुर, भरतीच्या लाटातून
वार्‍यासवे तुझा स्पर्श, भिने रंध्रारंध्रातून ..!!

निंब कदंब तरुच्या, पागोळ्यांची वेडी माया
थेंबाथेंबाचा आरसा, रूप तुझेच पहाया
येई भिजले पाखरू, तुझा निरोप द्यावया
तव स्मृतीची झुळूक, मोहरते सारी काया ..!!

नागिणीसम वेढे रात्र, डंख तुझ्या आठवांचा
स्वप्नवत आरशात, खेळ चाले चेहर्‍यांचा
कधी दाटे सभोवार, गंध धुंद सुगंधाचा
जाई पैल आकाशाच्या, माझा झोका झोपाळ्याचा ..!!

काय आगळीक घडे, का हे मन बहकले
वाट रोजचीच तरी, थबकती ही पाऊले
आतापावेतो असे ना, कधी आगळे घडले
तुझ्या सोबतच माझे, मन दूर रे चालले ..!!

कवयित्री: भक्ती आजगावकर

८ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

भक्ती, नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!

>> नागिणीसम वेढे रात्र, डंख तुझ्या आठवांचा
स्वप्नवत आरशात, खेळ चाले चेहर्‍यांचा

विशेष आवडलं.

davbindu म्हणाले...

सुंदर झाली आहे कविता ...

>>>काय आगळीक घडे, का हे मन बहकले
वाट रोजचीच तरी, थबकती ही पाऊले
आतापावेतो असे ना, कधी आगळे घडले
तुझ्या सोबतच माझे, मन दूर रे चालले ..!!

मस्तच ...!!!

Deepak Parulekar म्हणाले...

वाह ! सुंदरच ! अगदी नेहमीप्रमाणेच !
सॉरी यार मे ही कविता तुझ्यासाठी वाचु नाही शकलो. :)
आवडली हां. :)

क्रांति म्हणाले...

फार सुरेख रचना आहे.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

डंख जबरदस्त आहे. लाजबाब!

Sakhi म्हणाले...

अर्ध्य धन्यवादाचे !!!

आपल्या मनीचे विचार समोरच्याला कळतात, भावतात अन आवडतात ही भावना खूप सुखावह आहे ...

भक्ती
http://swarnim-sakhi.blogspot.com/

ulhasbhide म्हणाले...

"नागिणीसम वेढे रात्र, डंख तुझ्या आठवांचा
स्वप्नवत आरशात, खेळ चाले चेहर्‍यांचा"
.... छान

Sakhi म्हणाले...

धन्यवाद :)