ये ना!

हसतोस काय? ये ना, धरती मिठीत घे ना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

नुसत्याच चाहुली का? आभाळ फक्त काळे
हृदयात दाटलेले विरतील पावसाळे
अधिर्‍या तनामनाची ही आग सोसवेना
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

हळुवारशा सरींनी शिंपीत ये धरेला
कल्लोळ घेउनी वा पेटून ये इरेला
उजळून देत ये की उधळून देत ये ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

गर्भातल्या बिजांना फुटतील कोंब ताजे
हिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

हो, तेच थेंब अन् त्या वेड्याखुळ्या सरीही
नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळेना?
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

कवयित्री: क्रांति साडेकर

१२ टिप्पण्या:

Unique Poet ! म्हणाले...

सुंदर !!!! क्या बात है !

Suhas Diwakar Zele म्हणाले...

गर्भातल्या बिजांना फुटतील कोंब ताजे
हिरवाळतील राने, बहरेल स्वप्न माझे
दे चातकास तृप्ती, मयुरास नाचु दे ना!
ये सावळ्या घना, ये, चैतन्यदान दे ना!

सुंदर.. खुप आवडली !!

ulhasbhide म्हणाले...

असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल. अतीशय सुंदर,सहज आणि आशयघन.
"नसले नवीन काही, असते हवे तरीही
तू भेटसी नव्याने, इतके कसे कळेना?"
या ओळी सर्वात जास्त भावल्या.

davbindu म्हणाले...

असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल...+१

सहज, सुंदर कविता आवडली ...

Deepak Parulekar म्हणाले...

मस्तच !
सहज बोलवावं तसं सुंदर आवाहन आहे हे ! :)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

‘तू भेटसी नव्याने’ हे किती सार्थ आहे. कविता वाचून शृंगाराची ओढ हा विषय कधीही नवानूतनच राहातो आणि राहील असे वाटत राहिले. त्याच विषयावरची एक प्रसन्न ताजी, टवटवीत कलाकृती. वा!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

वा! छानच आहे कविता. कोणीतरी याला छानशी चाल लावली तर सुंदर गाणे बनेल.

Sakhi म्हणाले...

असं आवाहन केल्यानंतर तो सावळा घन नक्कीच बरसेल.
खरेच ..

खूप सुरेख ... :)

विनायक पंडित म्हणाले...

छानच! कुणी चाल लावली तर मस्त गीत जमून येईल!

Shreya's Shop म्हणाले...

मंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून त्याचा दुवा इथे देत नाही. गोड मानून घ्या - http://www.divshare.com/download/15127470-7fc

Shreya's Shop म्हणाले...

मंडळी, हे काव्य वाचल्यावर मला लगेच त्याची चाल सुचली. पहा योग्य आहे का ? मी गायिका / संगीतकार नाही पण चाल सुचली,गाविशी वाटली म्हणून गोड मानून घ्या.
आधीचा दिलेला दुवा काम करत नाहिये. हा घ्या नवीन दुवा. http://www.youtube.com/watch?v=T6Q8CByUUa4

क्रांति म्हणाले...

सगळ्यांना धन्यवाद!

श्रेयाताई, मस्तच जमलीय चाल. मला खूप आवडली. मी पण पाठ करीन.