शाळा सुरू झाली...

जूनचा दुसरा आठवडा त्यातच १३ जून म्हटले की मला आठवते उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू होणारी शाळा. आमची शाळा नेहमी १३ जूनलाच सुरू व्हायची. रविवार, सुट्टीचा दिवस असला तर एखादा पुढचा दिवस.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आराम, खेळ, दंगामस्ती, फिरणे वगैरे वगैरे गोष्टी करून मुलांचे मन ताजेतवाने झालेले असतेच. सोबत असते नवीन इयत्तेचे आकर्षण.

१ मे ला निकाल हाती दिल्यावर सोबतच यादी असते लागणार्‍या पुस्तकांची. ती पुस्तके घेण्याकरीता दुकानात लोकांची उडालेली झुंबड. मला सहसा गर्दी आवडत नाही. पण नवीन पुस्तके, वह्या घेतानाचा तो आनंदच काही वेगळा. त्यापुढे ही गर्दी काहीच वाटत नाही.  त्या नवीन पुस्तकांना, वह्यांना येणारा कागदाचा तो वेगळाच वास मस्त वाटे. माझ्याकडे काही जुनी आणि काही नवीन पुस्तके असत. नवीन पुस्तकांना वेष्टण (कवर) घालायला मला नकोसे वाटे. ती नवीन पुस्तकाची चमक सारखी बघत राहावीशी वाटे. पण जर ते पुस्तक नुसते तसेच वापरले तर ते खराब होण्याची शक्यता जास्त. म्हणून मग त्यावर वेष्टण चढविले जाई. मग मध्येच कधीतरी ते उघडून बघायचे. नवीन पुस्तके आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे जुने पुस्तक वापरताना त्यावर कोणी पेनाने लिहिलेले असेल तर ते मला आवडत नाही. पुस्तकाचे पानावर फक्त त्याची छपाईच असली पाहिजे, इतर काही नाही. नवीन पुस्तक कसे एकदम कोरे. आपल्या हक्काचे :)

पण ह्या उलट वही. वहीवर जेवढे जास्त लिहिले गेले असेल ते आवडते. कारण आपण किती लिहिले ते त्यातून दिसते. अर्थात कसेही वेडेवाकडे लिहिलेले नाही तर एकसुरी पानेच्या पाने भरलेली. मग ते बॉलपेनने लिहिले असेल तर आणखी मजा. लिहिलेल्या पानाच्या उलट्या बाजूवर त्याची जी छाप उठली असते, त्यावर लिहायला गंमत वाटत असे. जर शाई पेनने लिहिले असेल तर पान नुसते भरलेले वाटे आणि पुन्हा त्याला पाण्यापासून वाचवायची काळजी घ्या. तसेच लिहिता लिहिता हाताला शाई लागण्याची शक्यताही होतीच. पण एक आहे, शाई-पेन हे दिसायला बॉलपेन पेक्षा वरचढ. त्यामुळे ते सोबत ठेवणे असायचेच.
तशीच गंमत गणवेषासाठीही. ५ ते १० वी माझी शाळा एकच होती. त्यामुळे गणवेषाचा प्रकार एकच होता. आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट (विजार). दरवर्षी नसले तरी पण ते नवीन घेणेही व्हायचे. त्यात मग कोणत्या दुकानातून घ्यावे असा प्रकार. एका दुकानात चमकदार शर्ट असायचा तर दुसर्‍या दुकानात थोडा साधा. पण मग कोणता गणवेष शाळेत चालेल आणि आवडलेला ह्यांच्यात तडजोड करून नवीन गणवेष विकत घेतला जाई.

मग इतर गोष्टी जसे दप्तर. त्यातच मग पावसाची नुकतीच झालेली सुरूवात. त्यामुळे रेनकोट किंवा छत्री ही आलेच. छत्री वापरणे शाळेच्या काळात कमीच होते, निदान शाळेत येण्या-जाण्यापुरते. इतर वेळी बाजारात वगैरे जाताना छत्री वापरली जाई. माझी एक (नकळत) खोड होती. दरवर्षी माझ्या हातून एक छत्री हरवली जाणारच. म्हणूनही छत्री जवळ ठेवणे टाळले जायचे. तसेच दप्तरात पुस्तके भिजू नयेत म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याची व्यवस्था करा.

शाळेत गेल्यावर नवीन वर्ग. आपले काय पुलंच्या दामले मास्तरांसारखे एकातच खोलीत चार वर्ग नसायचे. हो, पुढील वर्षातील वर्ग-शिक्षिका ठरलेल्या असायच्या, पण तसा नियम नव्हता. निकाल देताना सांगून ठेवायचे की कोण असेल. मग ती वर्ग खोली कोणती ते सूचनाफलकावर वाचून त्या वर्गात जाऊन बसायचे. पहिल्याच दिवशी काही एकदम क्रम वगैरे नाही. त्या दिवशी वेळापत्रक मिळून कोणत्या विषयाला कोण शिक्षक आहेत ते लिहून घ्यायचे. बहुतेक वेळा आपल्या वर्गात कोणी नवीन विद्यार्थी आला असल्याचे पहिल्याच दिवशी कळायचे. नाहीच तर मग १-२ दिवसांत.  वर्गातही गंमतच सुरू असायची. कुठे शिकवणी (कोचिंग क्लासेस हो) लावली आहे का ह्याची चौकशी ही सुरू राहणार. मी ८ वी पर्यंत कधी ह्याचा उपयोग घेतला नाही. पण ८ वीत जेव्हा क्रमांक घसरला तेव्हा मग मलाही हे अनुभवावे लागले.

वर्गात बसण्याचा क्रम हा उंचीप्रमाणे होता. वर्गात एका रांगेत ३ बाक. डाव्या भिंतीला लागून  २ बाकांच्या रांगा मुलांकरीता, मग जाण्यायेण्याचा रस्ता. उजव्या बाजूच्या भिंतीला लागून १ बाक रांग मुलींकरीता . हे डावे-उजवे पक्के असेच नाही. तर आणखी नीट सांगायचे तर दरवाज्यासमोर एक बाक आणि विरूद्ध बाजूला २. मी वर्गात सर्वांत बुटका. त्यामुळे माझा पहिला बाक कधी चुकला नाही. फक्त भिंतीच्या बाजूला की बाहेरच्या ते ठरविले जायचे. पण त्यातही उंचीची अडचण नको म्हणून सहसा उंचीने लहान मुले बाहेरच असायची.
शाळेची फी वगैरे भरण्याचे काम आमच्याकडे नसायचेच. वडील ते स्वतः किंवा इतरांकडून करवून घ्यायचे. आम्ही आपले शाळा सुरू झाल्याच्या आनंदात (आणि दु:खातही, कारण सुट्ट्या संपल्या ;) ) राहायचो. 

अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर घरी जाण्याची परवानगी. घरी जाता जाता गंमतच करीत जाणार. घरी गेल्यावरही मग शेजार्‍यांचे "काय शाळा सुरू झाली ना?" हे वाक्य कानी पडणार. नेहमीचे खेळ खेळा. एखाद्याने शाळा बदलली असल्यास त्याची चौकशी करा.
रात्री जेवण झाल्यानंतर नवीन मिळालेल्या वेळापत्रकाप्रमाणे वह्या पुस्तके भरून ठेवायची. गणवेषाला इस्त्री करून ठेवायची. अरे नाही, माझ्याकरीता हे नव्हते. कारण माझा वर्ग नेहमी दुपारीच असायचा. सकाळचा वर्ग कधी मी अनुभवला नाहीच. निदान शाळेत. त्यामुळे दप्तर भरणे, कपडे इस्त्री करणे हे सकाळीच, शाळेला निघायच्या आधी व्हायचे.

दुसर्‍या दिवसापासून नियमित शाळा सुरू. मग त्याची हळू हळू सवय पडत जाणार.

आजही जेव्हा शेजारच्या मुलांच्या सुट्ट्यांनंतर त्यांना शाळेत जाताना पाहिले की ह्या सगळ्या आठवणी येतातच. आणि मध्येच वाटते, ते दिवस पुन्हा अनुभवता येतील का?

लेखक: देवदत्त गाणार

३ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सही शाळेचे दिवस आठवले.

रच्याक मी पण शाळेवर पोस्ट देणार होतो ;-)

davbindu म्हणाले...

शाळा सुरु होतानाच्या सर्वच घटनांचे लहानपणापासूनच प्रचंड आकर्षण असल्याने तुमची पोस्ट खूप भावली मला...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

पण नवीन पुस्तके, वह्या घेतानाचा तो आनंदच काही वेगळा.

अगदी खरे. वा! पहिला पाऊस आणि कोर्‍या पुस्तकांच्या गंधात मिसळलेल्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी जिवंत झाल्या. धन्यवाद.