मजलाच खूप छळते !

(तालिबान्यांनी एका अल्पवयीन मुलीस ती परपुरुषा बरोबर बोलली म्हणून तिला ४० फटक्याची शिक्षा सुनावली. फटके मारतानाचे दृष्य दिवसभर टी. व्ही. वर दाखवले जात होते. ते बघून सुचलेली ग़ज़ल)

जन्मून चूक झाली, अंधार आत गिळते
असणे जगात माझे, मजलाच खूप छ्ळते

धर्मांध राज्य जेथे, डोळस कुणी न दिसती
जे तालिबान म्हणती, सूज्ञास ते न कळते

मी बोलले कुणाशी, होता म्हणे गुन्हा तो !
चाबूक मारले मज, मन हे थिजून जळते

करण्यास न्याय माझा, नालयकात स्पर्धा
शरिया कशास म्हणती? त्यांना कधी न कळते

आम्हा मुलीस येथे, शिकण्यास का मनाई?
मज्जाव कमविण्याला, पोटात भूक जळते

आले कुठून सारे, धर्मार्थ सांगणारे?
चौफेर ख़ौफ़ असता, शक्ती तयास मिळते

भयग्रस्त सर्व जेथे, क्रांती कशी रुजावी?
जनताच ढुंगणाला, लावून पाय पळते

"निशिकांत" का स्त्रियांनी, बुरख्यात गुदमरावे?
का तर बघून आम्हा, त्यांचेच लक्ष ढळते


कवी: निशिकांत देशपांडे 
मो.नं. ९८९०७ ९९०२३

४ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह वाह... तिच्या मनातल्या भावना आणि प्रश्न उत्तमरित्या काव्यबद्ध केले आहे. !!

davbindu म्हणाले...

'ति'ची व्यथा योग्य शब्दात मांडली आहे ...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

जबरदस्त! ब्रेडविनर वगैरे कादंबर्‍या आठवल्या. पण या कवितेची ताकद काही वेगळीच वाटली.

विनायक पंडित म्हणाले...

निशिकांत! जबरदस्त विषय आणि तितकीच जबरदस्त मांडणी! अप्रतिम!