चेहर्‍यांचे पुस्तक !

चेहर्‍यांचे पुस्तक उर्फ फेसबुक आपल्यापैकी बहुतेकजण वापरतात. पण एखादी खरड टाकणे, काही छायाचित्रे डकवणे, आपल्या बातम्यांमध्ये कोणीतरी लावलेली चलतचित्रे आपणही गुपचूप इकडून तिकडे ढकलणे यापलिकडे आपण त्याचा वापर करत नाही असे मला वाटते. एकीकडे फेसबुक वरची आपली माहिती सुरक्षित असते का ? किंवा नेमकी कोणती माहिती फेसबुकावर ठेवावी ? किंवा खाजगी माहीती उपद्रवी माणसांपासून कशी लपवावी ? त्याकरता काय उपाय योजावेत यांसारख्या कितीतरी चर्चा रोज झडत असतात. दुसरीकडे सोशल नेटवर्कींग विशेषत: फेसबुक हे एक व्यसन आहे आणि ज्या तरूणाईने आपली खाजगी माहिती त्यावर जपूनच टाकावी असं अनेकदा सांगूनही तरूणाई मात्र येता जाता स्वत:चं प्रदर्शन करताना दिसते. काहीही असो.....पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे फेसबुकचा वापर केला गेला तर त्यातून बरचं काही चागंल घडू शकतं, घडलेलं देखील आहे. काही सामाजिक कार्य उभं राहू शकतं, काही चळवळी जोर धरू शकतात कारण आपल्या भिंतीवर डकवलेले एखादे वाक्य देखील हस्ते परहस्ते लाखो लोकांपर्यंत पोचते. अर्थात याचा वापर करताना नेमकी काय सावधगिरी बाळगावी किंवा कोणत्या युक्त्यांचा वापर करावा हे मी इथे सांगणार आहे.

१) सगळ्यात प्रथम आपल्या फेसबुक खात्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विचार करायचा तर ; ते कोणत्याही न्याहाळकात ( ब्राऊजर) वापरताना नेहमीच नुसते http:// असे न वापरता https:// असे वापरावे. आपल्या खात्यात एकदाच तसे नोंदवून ठेवल्यास रोज हे तपासायची किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून फेसबुक मध्ये प्रवेश केल्यास धास्ती उरत नाही. त्याकरता Account →Account Settings→Setings→Account Security इथे जावे. त्यानंतर secure browser (https://) या वाक्यासमोरील रिकाम्या चौकोनात टिचकी द्या. तुमच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून जर तुमच्या खात्याचा वापर केला गेला तर ते तुम्हाला कळावं म्हणून खालीच दिलेल्या (ईमेल्द्वारे अथचा एसेमेस द्वारे सूचना मिळण्याकरता म्हणून) एका किंवा दोन्ही चौकोनात टिचकी द्या. पान सेव्ह करा.

२) आता आपण आपल्या खात्याचा आपल्या व्यतिरिक्त इतर कोणीही दुसर्‍या ठिकाणाहून वापर केल्यास एसेमेस मिळावा अशी सोय तर केली...पण हा एसेमेस मिळवावा कसा ? तर त्याकरता Account →Account Settings →Mobile इथे जाऊन आपला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. फेसबुककडून तुम्हाला एक कोड एसेमेसद्वारे मिळेल, तो योग्य त्या ठिकाणी भरल्यावर आपला भ्रमणध्वनी फेसबुकच्या आपल्या खात्याकरता चालू होईल. आता त्यामुळे आपल्याला 9232232665 या क्रमांकावर एका एसेमेसद्वारे आपली खरड टाकता येईल. त्याकरता जालजोडणी आहे की नाही याची पर्वा करायला नको. इतकच नाही तर आपल्या सगळ्या किंवा काही ठराविक मित्र-मैत्रिणींच्या खरडी आपल्याला आता भ्रमणध्वनीवर मिळू शकतात. आता कोणाच्या खरडी आपल्या भ्रमणध्वनीवर मिळवायच्या, किती ते किती या वेळात त्या येऊ द्यायच्या, किती येऊ द्यायच्या, आपण संगणकावर फेसबुकचा वापर करत असताना येऊ द्यायच्या की नाही इ. गोष्टी आपल्याला इथेच ठरवता येतात. पान सेव्ह करावे.

३) याच पानावर उजवीकडे go to facebook mobile असे लिहिलेल्या ठिकाणी टिचकी द्यावी. पुढे जे पान उघडेल त्यात आपला नोंदवलेला भ्रमणध्वनी क्रमांक दिसेल. शिवाय एक विरोपाचा पत्ता इथे नमूद केलेला असेल. फेसबुकवर आपल्या खात्यात छायाचित्रे अथवा चलतचित्रे पाठवायची असल्यास या पत्त्याचा उपयोग होतो. हा कोणालाही जाहीर करू नये. अन्यथा कोणी गैरफायदा घेऊन त्त्यावर जे काही पाठवले जाईल ते आपल्या नावाने आपल्या मित्रमैत्रिणींना दिसू शकेल.

४) आता पुढे आपण जी काही माहिती खरड, छायाचित्र, चलतचित्र, दुवे इ. स्वरूपात आपल्या खात्यात टाकतो ती नेमकी कोणाला दिसावी / दिसू नये याचीही तजवीज आपण करू शकतो. पहिल्या पर्यायानुसार आपली माहीती सगळ्या जगाला दिसू शकेल. दुसर्‍या पर्यायानुसार सगळ्या जगाला नाही पण आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबरच त्यांच्या मित्र-मैत्रिणींनादेखील ही माहीती दिसू शकते. तिसर्‍या पर्यायानुसार फक्त आपल्याच मित्र-मैत्रिणींना ही माहिती दिसू शकते. आणि चौथ्या पर्यायानुसार आपण ही माहिती कोणाला दिसावी अथवा न दिसावी यावर नियंत्रण करू शकतो. चौथा customize हा पर्याय निवडल्यावर एक खिडकी उघडेल. यातील फक्त अमूक व्यक्तिंना ही माहिती दिसू द्यायची असेल तर specific people हा पर्याय निवडून; खालच्या रिकाम्या जागेत त्या व्यक्तिंची नावे द्यावीत. या उलट काही विशिष्ट व्यक्तिंपासून ही माहिती लपवायची असेल तर खाली hide this from च्या रकान्यात त्या व्यक्तिंची नावे द्यावीत. हे एखाद्या खरडीपुरते मर्यादीत असेल तर ठीक आहे पण हे कायमचे असेच ठेवायचे असेल तर सगळ्यात खाली make this my default settings च्या चौकोनात टिचकी देऊन पान सेव्ह करावे. आता ही परिस्थिती तुम्ही त्यात स्वत:हून बदल करेपर्यंत कायम राहील.

५) या व्यतिरिक्त आपण आपल्या कुटुंबियांबाबत, आपलं शिक्षण,नोकरी, जन्मतारीख, लग्नाचा वाढदिवस, नाती अश्या अनेक गोष्टी आपल्या profile मध्ये लिहित असतो. अशी माहिती सार्वजनिक होऊन विशेषत: महिला सदस्यांच्या बाबतीत तिचा गैरफायदा घेतलाही जाऊ शकतो. त्यामुळे आपली कोणती माहिती कोणाला दिसावी याबाबतीत दक्षता घेणे फार आवश्यक आहे. त्याकरता आपल्या Account →Privacy Settings मध्ये जाऊन customize settings वर टिचकी द्यावी. पुढे उघडणार्‍या पानावर आपण देत असलेली माहिती, इतर लोक आपल्याबद्दल देत असलेली काही माहिती आणि आपले संपर्क( पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, विरोप पत्ता, मेसेंजर पत्ता) अश्या विविध गोष्टी कोणाला दिसाव्यात याचं नियत्रंण करण्याची तरतूद आहे. त्याचा अवश्य वापर करून आपली खाजगी माहिती इतरांच्या हाती लागणार नाही याची खात्रीलायक तरतूद करावी. याच पानावर Things I share या भागात आपण टाकत असलेली चलतचित्रे आणि छायाचित्रे देखील कोणाकोणाला दिसू शकतील याची सोय करता येते.

६) फेसबुकवर एक apps नावाचा प्रकार असतो. आजकाल बर्‍यचश्या संकेतस्थळावर आपल्या फेसबुक खात्याचे नाव वापरून प्रवेश करता येते. अश्या वेळी आपण त्या संकेतस्थळाला आपली फेसबुकवरची खाजगी माहीती वापरायची एक प्रकारे मुभाच देत असतो. त्या बदल्यात ते संकेतस्थळ आपल्याला आपली त्यांच्या संकेतस्थळावरची माहिती / दुवे बिनदिक्कत फेसबुकवर जोडायला आणि तिथल्या तिथे पहायला देतं. उदाहरणार्थ issuu या संकेतस्थळावर आपण काही ई बुक्स साठवलेली असतील, त्यातले एखादे जर आपल्याला फेसबुकवर जोडायचे असेल तर ही apps या प्रकारचे काम करतात. थोडक्यात आपली इतरत्र साठवलेली छायाचित्रे, चलतचित्रे जशी आपण आपल्या ब्लॉगवर किंवा वर्डप्रेस जालनिशीवर जोडतो तेच काम ही apps मंडळी करतात. पण अशी सरसकट सगळी apps वापरणं धोक्याचं असतं. त्यामुळे नेमकी कोणती apps वापरावीत, कोणाला किती मुभा द्यावी याचं नियत्रंण आपल्याला Account→Privacy Settings मध्ये जाऊन करता येईल.

७) आत्तापर्यंत आपण फेसबुकवर छायाचित्रे, चलतचित्रे, इतर दुवे, जोडू शकतो, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एसेमेस धाडू शकतो हे इतकं पचनी पडलेलं आहे. पण आपल्याच एखाद्या मित्र-मैत्रिणीने टाकलेला टेक्स्ट मेसेज आवडल्यावर आपण पायरसीचा आळ येऊ न देता आपल्या खात्यातही कसा टाकू शकतो ?

त्याकरता आवडलेल्या टेक्स्ट मेसेज च्या मुळाशी जावं लागेल :-) थोडक्यात त्या मेसेजवर दाखवलेल्या ठिकाणी टिचकी देऊन, मग राइट क्लिक करून तो दुवा कॉपी करायचा , मग आपल्या भिंतीवर जाऊन तिथे link मध्ये तो दुवा डकवायचा (paste) आणि जोडायचा(attach) . मूळ व्यक्तिच्या नावासकट तो मजकूर तिथे दिसेल. तो पुढे धाडून(share) द्यायचा.

फेसबुक ग्रुप्स किंवा फेसबुक पेज हे विषय इथे घेतलेलेच नाहीत. या विषयांवर लिहिण्यासारखेही बरेच काही आहे. पण ते पुन्हा केव्हातरी.....तूर्तास इतकेच पुरे.

___________________________________

लेखिका: श्रेया रत्नपारखी

१४ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

श्रेता, खरंच उपयुक्त माहिती. आजकल जितकं आपण सोशल होऊ, तितका आपला त्रास वाढतो.

धन्स !!

सिद्धार्थ म्हणाले...

>> आजकल जितकं आपण सोशल होऊ, तितका आपला त्रास वाढतो.

सुझेला अनुमोदन.

हेरंब म्हणाले...

खूप उपयुक्त माहिती.. आवडली.

Deepak Parulekar म्हणाले...

आजकल जितकं आपण सोशल होऊ, तितका आपला त्रास वाढतो.

१००% पटेश !
उपयुक्त माहिती आणि सुंदर लेख !

Shreya's Shop म्हणाले...

सुहास, हेरंब, दीपक धन्यवाद.

davbindu म्हणाले...

श्रेता, खरंच उपयुक्त माहिती. आजकल जितकं आपण सोशल होऊ, तितका आपला त्रास वाढतो.

धन्स !! +११११११

क्रांति म्हणाले...

खूपच मह्त्वाची आणि उपयुक्त माहिती आहे. आता चेपु वापरणं आणखी सोपं आणि सुरक्षित होईल.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

कालपरवाच बातमी वाचली की लाखो लोक इथले खाते बंद करताहेत म्हणून. ही माहिती असेल तर बंद करणार नाहीत. असो. विषय मनोरंजक नसूनही लेख वाचनीय. धन्यवाद.

Shreya's Shop म्हणाले...

धन्यवाद....देवेंद्रा,क्रांतिताई आणि कांदळकरसाहेब...हे लेख लिहून प्रकाशित होईपर्यंत अजून काही नवीन माहिती मिळवली. पण ती पुन्हा केव्हातरी :-).

अनामित म्हणाले...

Very nice information...

Sakhi म्हणाले...

surekh mahiti..

विनायक पंडित म्हणाले...

श्रेता, खूपच उपयुक्त माहिती दिलीत.आभार! मला या अंकाचं डिझाईन ज्याम आवडलंय! विशेषत: ब्लिंक होत रहाणारं ’प्रवेश’! त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही सरळ अनुक्रमणिका दिली आहे, लेखकाचं नाव न टाकता, हे ज्याम आवडलं! त्यामुळे उत्सुकता वाढते आणि सगळं वाचलंही जाऊ शकतं! बाकी छायाचित्र आणि पडणारा पाऊस, रंगसंगती इत्यादी उत्कृष्टंच!

Shreya's Shop म्हणाले...

धन्यवाद महेश, सखी, विनायक
लेखकाचं नाव लेखाला न जोडण्यामागचं कारण तेच होतं....कोणा एकाला झुकतं माप मिळू नये, सगळं साहित्य वाचलं जावं, त्यावर प्रतिक्रिया मिळाव्यात. अर्थात बर्‍याच जणांना अंकाचा प्रवेश सापडला नाही त्यामुळे चाचपडले :-).

ulhasbhide म्हणाले...

उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद.